Friday 7 December 2018

पानगळ


आता पुढे काय ???
जेंव्हा जेंव्हा हा प्रश्न पडतो,
तेंव्हा समजायचं की,
पानगळ सुरु झाली.

वसंताच्या आगमनाची,
शिशिरात्मक सुरुवात.

जुने, जाणते,
ज्यांचा विसर्ग व्हायलाच हवा असे,
जडत्व आणणारे,
ज्यांच्या कुबड्यांवर विसंबून आपण स्वतःला मोकळं समजतो,
असे काहीसे...

विचार....

जे गळून पडत असल्यामुळे,
आता पुढे काय ???
जेंव्हा जेंव्हा हा प्रश्न पडतो,
तेंव्हा समजायचं की,
पानगळ सुरु झाली.


ज्यांच्या जोखडातून आपण मुक्त होत असतो,
आणि घालत असतो साद _ _ _
आपलीच . . . आपल्यालाच . . .
आणि ऐकू येतात आपल्याला तेजस्वी, ओजस्वी शब्द...
साथ देणारे,
उद्याच्या यशाची ग्वाही देणारे,
काही शब्द...

आता पुढे काय ???
जेंव्हा जेंव्हा हा प्रश्न पडतो,
तेंव्हा समजायचं की,
पानगळ सुरु झाली.



Saturday 11 August 2018

अनुभव 

प्रवास म्हणजे एक अद्भुत अनुभव असतो. जस कवितेत कुणीतरी लिहिलंय ना  की अनुभूती हि नित्य नवी अन सदा जुनी. साध ऑफिसला जायच  म्हणजे काय तयारी करावी लागते हे फक्त जाई त्यांच्या वंशा तेंव्हा कळे.  साध्या सध्या गोष्टीसुद्धा खूप अवघड वाटू लागतात जेंव्हा ऑफिस  बस पकडायची असते. एकतर बस स्टॉप हा आपल्या  घराजवळ असतो, अगदी दोन मिनिटांच्या , सहज चालत जाण्यायोग्य अंतराचा. पण हेच अंतर मैलांसारखा होऊन जात जेंव्हा सकाळी थोडासा उशीर होतो. जास्त नाही, पाच दहा मिनिटांचाच, पण तीच पाच दहा मिनिटे  आपल्याला ब्रह्मांड आठवून देतात. माझ्या बाबतीत तर हे अगदी नित्याचाच झालय.  मी बस स्टॉप जवळ पोहोचावं तोपर्यंत ती आपल्या  डोळ्यासमोरून निघून  जावी, आणि सहकाऱ्याला हाक मारावी, तर त्याने ऐकून न ऐकल्यासारखं करावं किंवा खरंच त्याला ऐकू न जावं. मग थोडा बसचा पाठलाग करून थांबवण्याचा निष्फळ प्रयत्न. मागून येणारी एखादी टॅक्सी, कॅब किंवा रिक्षा करून पुढील स्टॉपवर जाऊन थांबायचं एवढच माझ्या हातात. ह्या साऱ्या धावपळीत होणारा मनस्ताप. पण हा मुद्दाच नाही बोलण्याचा. या प्रवासात मिळणारा अनुभव हाच खरा मुद्दा आहे.
प्रवास ह्या विषयावर आधीच खूप जणांनी लिहून ठेवलय, त्यात मी काय अजून भर घालणार म्हणा. पु लं ची म्हैस आठवतेय का? नाही म्हणणारा विरळाच. त्यांचा पेस्टनजी बरोबरचा रेल्वेचा प्रवास, म्हैस या कथेत कोकणातील प्रवास वाचताना डोळ्यासमोर एखादा प्रसंग घडत आहे व तो आपण स्वतः तिथेच उभ राहून अथवा त्या पात्रांपैकीच एक होऊन पाहत आहे असं माझ्यासकट प्रत्येक वाचकाला वाटत असणार. इतकं प्रभावीपणे लिहिता याव हि एक सुप्त इच्छा.
बस स्टॉपवर उभं असताना गाडीची वाट बघता बघता इतर बारीक सारीक निरीक्षणे करणे हा एक विरंगुळाचं आहे. जो खूप साऱ्या आठवणी आणि अनुभव देऊन जातो. जरा आपल्या सकाळच्या व्यस्त कार्यक्रमाचं जर बारकाईने निरीक्षण केलं तर खूप सारे प्रसंग डोळ्यासमोर तराळतील.  घरातून बाहेर पडताना " अरे रुमाल घेतलास का?" किंवा "अहो पंचिंग कार्ड, मोबाइल आणि चार्जर घेतला का?" असे प्रश्न सर्वांच्याच कानावर पडत असतात, आणि आपण हो सर्व घेतलय बरोबर म्हणत पटकन बूट पायात सरकवत असतो किंवा बुटांची लेस बांधत असतो. ह्यावेळी प्रश्न विचारण्याचा चेहेरापण न बघता घाईने दरवाज्यातून बाहेर पडतो. आणि एक छानसा अनुभव घ्यायचा राहून जातो. आता पुढच्या खेपेस जरा मग वळून बघू की समजेल दरवाज्यापाशी कुणाची आई, पत्नी वाहिनी किंवा बहीण उभी असते जी समाधानाने बघत असते गडबडीत जाणाऱ्या व्यक्तीकडे. थोडीशी चिंतापण जाणवेल त्या हसऱ्या चेहेऱ्यात, की भाजीत मिठंतर  जास्त नाही ना पडलय, किंवा बस चुकू नये म्हणजे झालं अशी काळजीसुध्धा. कधी एखादा चिमुकला हात टाटा करत हालताना दिसेल तर कधी येताना माझ्यासाठी चॉकलेट आणा बाबा... अशी छानशी मागणी. तर कधी मी आज नक्की लवकर येतो पिलू, मग जाऊ आपण फिरायला, आणि हे ऐकल्यावर एक निरागसपणे  लुकलुकणारे डोळे आणि एक खट्याळ हसू जे सांगत असत मला माहित आहे बाबा खोटं बोलताय तुम्ही .. पण हे सार आपण अनुभवतो का?

 रोज ऑफिसच्या बस मध्ये पुढच्या रांगेत खिडकी कडेला एक व्यक्ती नेहेमी आढळते.  तीच जागा आणि तीच व्यक्ती हे एक समीकरणच होऊन बसलय माझ्यासाठी. चेहेऱ्यावर एक मिश्किल भाव.  सदा आनंदी आणि उत्साही. पावसाच्या दिवसात आपण पावसाची तक्रार करत असताना हा मात्र अगदी आनंदाने त्याकडे बघत असायचा. 


   

Thursday 9 August 2018


एक विचार ... 



आपलेच दात आणि आपलेच ओठ,
मूग गिळून चिडी चूप....

आळी मिळी गुप चिळी ,
बळी तोच कान पिळी ....

तूप, दूध, वरण, भात,
वाटप म्हणजे मापात पाप....

सर्वेक्षण, संवर्धन, संरक्षण, आरक्षण,
नाव मोठं, आणि खोटं लक्षण....

लोकं  जमावी, तर डोकी चार,
दर्दी कमी, आणि गर्दी फार....

खायला काळ आणि भुईलाभार,
मिळेल ते भरून, होईन पसार....

पटलं तर ठीक, नाहीतर काय,
कुणासाठी  कुणाचंही , अडतं नाय .....

Saturday 4 August 2018

विडंबन -
मूळ कविता - फटका 
कविवर्य - अनंत फंदी



आजच्या जीवनातले एक वास्तववादी चित्रण, ज्यात आपल्याला जाणवते कृत्रिमता, ढोंगीपणा, व स्वतःच्या फायद्यासाठी गैरमार्ग अवलंबून केलेले कृत्य. हाच मुद्दा मांडण्यासाठी विडंबन कविता ......... ह्या विडंबनासाठी कविवर्य अनंत फंदी यांची, अथवा प्रकाशकांची परवानगी घेतलेली नाही. त्याबद्दल क्षमस्व...



कवितेचे नाव - झटका 

रडत वाट तुडवीत जाण्यापरी, लुटालूट कधी सोडू नको
संसारामध्ये काय ठेवले बाई - बाटली विसरू नको

मीच मोठा शहाणा आहे, स्वतःला कमी कधी लेखू नको
आपल्या मोठेपणासाठी, इतरांची गय कधी करू नको.

स्वहितासाठी सर्व करावे, कशातही कमीपणा मानू नको,
अरे खुशामत काय चीज आहे, पाय चाटण्या लाजू नको.

दारू, मटका, जुगार, चोरी, लाचखोरी, नाही म्हणू नको,
पैशांसाठी वाट्टेल ते कर, मागे फुडती पाहू नको.

आपल्या गाठी धनसंचय कर, हवाला घोटाळे वर्ज्य नको,
सात पिढ्यांची तरतूद करूनही, आठवीला तू विस्मरू नको.

झटपट पैसा, गाडी बंगला, मिळवायला तू कचरू नको,
घाम गाळत जगण्यापेक्षा, सोपा शॉर्टकट विसरू नको.

हजारो "तुषार" रेकूनी गेले, त्यातील तू एक होऊ नको,
अनंतात एक आहेत "फंदी" , फटक्यास त्यांच्या जगी तोड नसो.


Sunday 22 July 2018

सहजता

कस असता ना, एखादी गोष्ट सहज मिळाली, त्यासाठी काही कष्ट करायला लागले नाहीत की आपण त्याकडे गांभीर्याने पाहत नाही. हे काय होणारच होत, अस म्हणून त्या गोष्टीकडे कानाडोळा करतो. पण जेंव्हा साध्यासाध्या गोष्टीसुद्धा आपल्याला वाकुल्या दाखवतात, किंवा आपल्या मनाप्रमाणे होत नाहीत, किंवा होणार होणार म्हणत असताना घडून येत नाहीत तेंव्हाच आपल्याला त्यांचे महत्व कळते. या छोट्या छोट्या गोष्टीच आपल्याला जीवन कस जगायच हे शिकवतात. आपल्याला जीवनाचे धडे देतात. आपले जीवन समृद्ध करतात. फक्त आपण त्यांच्याकडे डोळे उघडे ठेऊन बघितलं पाहिजे. त्याना कमी न लेखता, आपुलकीनं त्यांच स्वागत करून, त्यांना गोंजारून, जर विचारलं की, " अरे बाबा, आज कस येण केलस तू? आज काही  विशेष आहे का?" मग बघा ती छोटीशी  गोष्ट कशी साखरेसारखी पटकन विरघळून जाते व त्या घटनेचा खरा अर्थ आपल्याला उलगडून दाखवते.
उदाहरण म्हणून एक छोटासा किस्सा सांगतो. माझ्याच मित्राने मला ऐकवलेला. "अरे परवा छोकरा शाळेत जायला नाही म्हणत होता, रडून रडून घर डोक्यावर घेतल त्याने. कारण काहीच नव्हतं, सकाळ सकाळची वेळ यार? मग काय दिले फटके. कदाचित जरा जास्तचं  मारले असतील  रे, कारण बायकोने पटकन हात अडवला माझा . पोर पण हुमसून हुमसून रडलं. लहान असल्यामुळे त्याने मुकाट्याने मार खाल्ला. उलट सुद्धा बोललं  नाही. रडत रडत आवरलं आणि रडतच शाळेत गेलं." कदाचित माझा अहंकार क्षणिक सुखावला असेल त्याला फटकारल्यावर." मी जरा चुकलोच होतो हे आतून जाणवत होत, पण ती वेळच अशी होती की काय करणार. नेहमीप्रमाणे आवरल आणि गेलो ऑफिसला. कामाच्या धबडग्यात विसरून गेलो सकाळची घटना. तस पाहिलं तर क्षुल्लक घटना. संध्याकाळी नेहमीप्रमाणे साडे आठच्या सुमाराला पोचलो घरी. नेहमी सारखा दंगा नाही, टीव्ही सिरियलचा आवाज नाही, कानावर काहीच येत नव्हत. बायको म्हणाली "अहो आज त्याला शाळेत लागलं बघा, जरा कमी डोळा वाचला. आत झोपलाय आल्यापासून " काळजात धस्सं झालं. पायातले बूट पण न काढता तसाच आत पळालो. बघितलं तर डाव्या कुशीवर अंगाचे मुटकुळे करून चिरंजीव झोपले होते. अंग पण गरम लागत होत. हनुवटीला धरून चेहेरा माझ्याकडे फिरवून बघितला तर खरंच डोळ्याच्या खाली काळ निळं झाल होत. नाक सुजल्या सारख झाल होत. पुन्हा पुरुषी अहंकार जागा झाला. बायकोवर डाफरणे सुरु झालं. "तू मला का कळवलं नाहीस?, शाळेत विचारलस की नाहीस? इतक लागल पण मला कळवावे अस वाटलं नाही का तुला? जे तोंडाला येईल ते बोलत गेलो. बायको मात्र शांत होती. थोड्या वेळाने बडबड शांत झाल्यावर म्हणाली, "जरा मोबाइल बघा किती मिस्ड कॉल आहेत ते?" खरंच पंधरा ते वीस मिस्ड कॉल होते. साडेतीन ते साडेसहा या दरम्यानचे. माझ्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाच्या मीटिंगमध्ये असल्यामुळे बायकोचा कॉल घेणे, अथवा नंतर परत कॉल करून तिला विचाराणे  की तू कॉल का केला होतास हे मी नेहेमीच टाळत आलोय याची प्रखर्षानें जाणीव झाली.
"आल्यापासून सारखा रडत होता, बाबांना सॉरी म्हणायचं आहे, मी काही नाही केलं ग,फोन लावून दे, त्यांनाच  सगळं सांगतो म्हणून हट्टून बसला होता. काय झालाय ते मला सांगायला तयार नव्हता. कशी तरी समजूत घातलीं, डोळ्याखाली औषधं लावलं , नाकावर औषधं लावलं, बाबा आज लवकर घरी येणार आहेत आल्याआल्या तू त्यांना सॉरी म्हण हं, अस म्हटल्यावर कुठे त्याची समजूत पटली. मग सगळं सांगितलं.  दुपारच्या सुट्टीत पाणी पिताना दुसरी मूल भांडत होती, त्यातल्या एकाचा ह्याला धक्का लागला. नळावर तोंड आपटलं मित्रांनीच मॅडमकडे नेलं, औषध लावल हे सगळं त्याला तुम्हालाच सांगायचं होत. आल्यावर जेवला नाही, दुधपण नाही घेतल, तसाच पडून होता. बाबा तुझा फोन पण उचलत नाहीत, अजून माझ्यावर रागवलेत आणि माझ्या डोळ्याला लागलाय म्हटल्यावर अजून चिडतील. तू आत्ताच फोन लावून दे मी सांगतो त्यांना सर्व काही. मीच मग कशीतरी समजूत काढलीं अरे बाबाना खूप काम असत, दुपारचं जेवण पण ते कधी वेळेवर घेत नाहीत, मीटिंग मध्ये असतील ते आपण नको त्यांना त्रास द्यायला. आपल्या मुळे त्यांचे सर त्यांना ओरडू देत का? आणि तू जर औषध नाही लावून घेतलस तर त्यांना अजून राग येईल हं. अस म्हटल्यावर जरा कुठे पटलं त्याला. औषध लावून घेतलं, पण दवाखान्यात यायला तयार नाही झाला. बाबांच्या बरोबरच जाईन म्हणाला. काहीही न खाता तसाच झोपला बघा."
मी तरी काय बोलणार, मीच प्रत्येक ठिकाणी चुकलो होतो रे, सकाळी पण त्याला उगाच मारलं. त्यालासुद्धा आतून काही तरी होत असेल म्हणूनच तो आज शाळेत जायला नको म्हणतोय हे मला कळलंच नाही. दोन फटके दिले कि पोरं ऐकतात, नाहीतर प्रत्येक गोष्ट त्यांची ऐकली कि शेफारतात हे ड़ोक्यात अगदी फिट्ट बसलय ना. त्यात सकाळी ती सुद्धा मला काही बोलली नाही फक्त हात अडवला तिनं. तेंव्हा पण माझ्या काही लक्षात आलं नाही. तिचे दुपारी इतके कॉल येत होते, मी नेहेमी प्रमाणे उचलले नाहीत. नेहमी प्रमाणे रोजच्याच काहीतरी कटकटी सांगायला फोन केला असेल म्हणून दुर्लक्ष्य केलं, आणि नंतर फोन करून तिला विचारलपण नाही. हेच जर मी तिचा कॉल उचलला असता किंवा थोड्या वेळाने तिला परत कॉल केला असता तर पटकन घरी जाऊन त्यांना दवाखान्यात नेता आल असत. पण नाही, स्वतःचा अहंकार जपायचा होता ना मला. पण हेच जर ती अस वागली असती तर मी तिला माफ केलं असता का? तिनं किती सहजतेनं मला माफ केलं ? आमच्या बोलण्याने तो जागा झाला होता. त्या दोघांच्या देखत स्वतःचे डोळे ओले आहेत हे स्वीकारणेपण मला जड  झालं. मला बघताच माझ्या गळ्यात पडून तो न केलेल्या चुकी बद्दल सॉरी म्हणून हुमसून हुमसून रडायला लागला. त्याला समजावणं मलाच अवघड होत, पण नेहेमीप्रमाणे तीच पुढे आली, त्याला पटकन उचलून म्हणाली, " अरे ते तुझ्यावर नाही , माझ्यावर चिडलेत, इतका वेळ त्याला डॉक्टरकडे का नेलं नाही म्हणून.? आणि हळूच मला खुणेंन तयारी करायला सांगितली.
आता मात्र माझी मलाच लाज वाटायला लागली, एवढस पोरं सकाळी मार खाऊन शाळेत गेलं. शाळेत धडपडल, जरा कमी डोळा वाचला त्याचा. आणि एवढ सगळं होऊन, मी मारलेलं विसरून, बाबाना काय वाटेल याची चिंता करत होत.  बाबानी उगाचच मला फटके मारलेत हे विसरून त्यानं मला नकळत माफही केलं होत, बायको सुद्धा सकाळी काही म्हणाली नाही, तुम्ही चुकलात त्याला मारायला नको होत, तुमच्या मुळेच हे सार घडलं, आज एक दिवस पोर शाळेत गेलं नसत तर काय बिघडलं असत?, एक साधा फोन तुम्ही उचलू शकत नाही?, असं काय जगा वेगळं काम तुम्ही करता? आणि फोन उचलायला नाही जमलं त्या वेळी तर नंतर तरी करू शकता कि नाही? ह्यातलं एक हि अक्षर न बोलता, चूक माझ्याकडून घडलेली असताना सुद्धा त्या बद्दल एक अक्षरही  न बोलता ती अतिशय समजुदारपणे ह्या प्रसंगात मला सावरत होती. कुठल्याही मनजेमेंटचे कोर्स न करता ही घटना ती हळुवारपणे पण समर्थपणे सांभाळत होती.
"सांग मला, आता एवढं शिकून, कॉर्पोरेटमध्ये काम करुन पण आपण कसं वागतो? आणि घरातली सगळी कशी वागतात? कोण समजुद्दार आहे आपण की ते?" हा प्रश्न माझ्या साठी होता हे मला कळायला थोडा उशीर झाला. अस वाटत होत कि जणू मीच त्या प्रसंगात आहे आणि मित्राऐवजी मीच हे सार प्रत्यक्ष जगतोय. थोड्या फार फरकाने माझ्या बाबतीत पण हेच घडत होत, पण मी असा विचार कधीचं केला नव्हता.
सांग की कसं वागायला पाहिजे होत मी? काय सांगू मी तरी, माझ्याही बाबतीत असे प्रसंग घड्लेत पण मी असा कधीचं  विचार केला नाही रे अजून. " तर मग कर विचार. सहजता हेच एक साधन आहे आपल्याकडे ह्या प्रसंगात वापरायला. कारण ती गोष्ट घडत असताना आपण सारासार विचार करत नाही. आणि वेळ गेल्यावर पश्चातापाशिवाय हाती काही उरत नाही. तेंव्हा प्रत्येक गोष्टीकडे सहजतेने बघ, हे असेच घडणार होते हे मनाला पटवायला शिकव, म्हणजे अहंकार दुखावणारपण नाही आणि मुख्य म्हणजे सुखावणारपण नाही. दोन्हीही गोष्टी घातकच. ह्यातून सुयोग्य मार्ग म्हणजे घडलेला प्रसंग सहजते स्वीकारणे आणि त्यावर ताबडतोब कुठलीही प्रतिक्रिया देणे टाळणे म्हणजेच जगण्यातली खरी सहजता. काही काही प्रसंगात आपण उगाचच अर्थाचा अनर्थ करतो, स्वतःचा खोटा अहंकार जपतो, आणि मुख्यत्वे त्या घडलेल्या घटनेबद्दल करणे देत बसतो. चुकांचे भले मोठे गाठोडे असंख्य कारणांच्या खांद्यावर लादून आयुष्यभर स्वतःला बांधून घेतो आणि दोष मात्र देतो दुसर्यांना. -- ------------------ माझ्या मित्राच्या बाबतीत घडलेला हा प्रसंग असो की माझ्या, किंवा आणि कुणाच्या, पात्रे कुठलीही असोत कर्ते तर आपणच ना ?? घटना थोड्याफार फरकाने वेगळ्या असतील पण त्या किती सहजतेने आपण हाताळतो ह्यावरच सर्व अवलंबून आहे. होय ना, पटलं का???????

Friday 11 May 2018

आठवण

 आठवण

शाळेच्या बाकावरती बसल्यावर नेहमी बाहेरचे जग सुंदर दिसायच.
नेहेमी वाटायच, की किती छान आहे यांचं जगणं. कधीही, कुठेही, केंव्हाही व कसंही जा, कोणाची आडकाठी नाही की भिती  नाही. कसलंही बंधन नाही. मनसोक्त फिरा. कुठे गेला होतास, कुणा बरोबर होतास, काय करत होतास, प्रश्नांची सरबत्ती नाही. फक्त मुशाफिरी. किती भाग्यवान आहेत हि मोठी लोक. हवे ते कपडे, छान पैकी सायकल (हो..  माझ्या लहानपणी मनासारखी सायकल, हे एक स्वप्नच होत) आणि केसांचा कोंबडा (खेडेकर सरांचा शब्द.  - माझे मराठीचे सर.) करून फिरत असतात. नाहीतर आम्ही, रोज सकाळी सात ते दुपारी बारा पर्यंत शाळेत... आपण पण लवकर मोठं व्हावं, पैसे कमवावे, हवे तसे खर्च करावे.. क्या बात हे!

 पण म्हणून शाळा आवडत नाही, अस अजिबात नाही हं. वर्षातला एकही दिवस कधीहि शाळा चुकवली नाही. अगदी बर नसताना सुद्धा. आई तर अजूनसुद्धा म्हणत असते, बर नसल कि तुला शाळेत जायचा ऊत यायचा. रोज वेळेच्या आधी अर्धा एक तास तरी शाळेत पोचायचो. घरातूनच लवकर बाहेर पडायचं हे ठरलेलंच. त्यासाठी आदल्या दिवशी पासूनच तयारी केलेली. गृहपाठ (हो आम्ही गृहपाठाच म्हणायचो, कारण होम वर्क असा शब्द त्यावेळी मराठी शब्द कोशात समाविष्ट नव्हता. माझी मुलगी मला ठसक्यात ठणकावते ... बाबा गृहपाठ नाही हो होमवर्क करायचा आहे  मला.  आणि हो माझी मुलगी मला बाबाच म्हणते... तिलाही आवडत आणि मला ही.) तर गृहपाठ करून, सर्व वह्या (आताचे नोट बुक ) कंपास पेटी (त्यातही कॅमल ची असेल तर फारच अभिमानाने) पुस्तके दप्तरात (स्कूल बॅग हो बाबा.. इती कन्या..) भरून खिडकीच्या खोबणीत किंवा दाराच्या मागे ठेऊन द्यायचं, म्हणजे सकाळी अजिबात गडबड नाही. अंघोळ एक्दम कोमट पाण्याने. ओलसर केसात थोडेसे खोबरेल तेल भरपूर चोळून लावलेलं. पांढरा शर्ट व खाकी अर्धी चड्डी. तेंव्हा फक्त कॉन्व्हेंटच्या शाळेत मुलांनां फुल्ल पॅन्ट असायच्या. घरापासून शाळा बहुतेक आठ एक किलोमीटर लांब असेल. सायकलमध्ये हवा नेहेमी भरून ठेवलेली. गरम गरम चहाच्या वाफां बघत शिळी चपाती चहात बुडवून खायची सवय तर आम्हां सर्व मुलांमध्ये समान होती. मुलीं बद्दल माहित नाही.... बहुतेक तीच असावी. मुलींशी बोलणे दुरापास्त, तर त्यांच्या सवईंबद्दल माहिती असणे म्हणजे.....
चहा संपला रे संपला की " ए...  आई, येतो ग. ... " " शिस्तीत जा रे, हायवे  वर  सायकल जोरात पळवू नकोस. शाळा सुटली कि सरळ घरी यायचं..."  "बोंबलत फिरत बसू नकोस मित्रांबरोबर" हे वाक्य कंसात असायचे. (आजच्या भाषेत सायलेंट - जस सायकॉलॉजि मध्ये P असत तस )  चाळीतलं घर आमचं. तीन सरळ खोल्या रेल्वेच्या डब्यांसारख्या सरळ. अंगणातले बांबूचे गेट व्यवस्थित बंद केलेले असायचे. आतून व बाहेरून मेंदीची झाड लावून भक्कम केलेलं. दोन बांबू बाजूला सरकवले कि सायकल बाहेर काढून परत गेट बंद करायचा हा शिरस्ता नाहीतर गुरं आत येऊन शेणाने सारवलेलं अंगण उकरून ठेवणार हे ठरलेलं. तस  बघितल तर अंगण करायचं म्हणजे माती उकरून त्यात पाणी मारून धोपटण्याने धोपटून धोपटून एक सारख केल जायचं. नंतर मग चाळीतल्या सर्व बायका एकत्र येऊन ते शेणाने सारवून घ्यायच्या. अर्थात हे शेण आम्हीच सर्व मुलांनी आसपासच्या चौंडयातून गोळा केलेलं. चौंडा म्हणजे शेताचा तुकडा, कोकणात जमीन माणसांसारखी स्वतंत्र व्यक्तिमत्वाची ना, त्यामुळे वेगळीवेगळी, तुकड्या तुकड्यांची. अंगण करायचा कार्यक्रम हा ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात दर वर्षी ठरलेला.  मुलांना हुंदडायला भरपूर जागा मिळावी म्हणून.
एकदा का सायकलला टांग मारली कि चाळीतून बाहेर पडून एकच माणूस जाऊ शकेल अशी पायवाट ओलांडायचो . दोन चौंडयांना वेगळं वेगळं करणारा मातीचा बांध म्हणजे आमचा रस्ता. त्यावरून जोरात सायकल पळवत मुख्य रस्त्यापर्यंत यायचं. मग यायचा मेन रोड. मुंबई हायवे. त्यामुळे रहदारीचा. शाळेपर्यंत पोचताना दोन मोठे नाके लागायचे. तिथून सायकल फिरवायला  जास्त मजा यायची. वाटेत एक मोठे कॉलेज लागायचे... तमाम शाळकरी वर्गबंधूंचे आकर्षण. मुलं मुली एकत्र बोलताना पाहून हुरळून जाणारे आम्ही सर्व शाळकरी जीव. तिथे आपसूक पाय रेंगाळायचे. सायकलची गती (सॉरी स्पीड ) आपोआप कमी व्हायची. आज काय छान  बघायला मिळतंय का याची उत्सुकता व ती घटना वर्ग सुरु झाल्यावंर बाकबंधूला (आजच्या भाषेत बेंच मेट) सांगायची अनावर इच्छा. एकदा का ते कॉलेज मागे सरले कि आपोआप सायकलचा वेग वाढायचा. आपल्याच वेगाने जाणारा एखादा सायकलस्वारांचा  घोळका ओलांडून पुढे जायची उर्मी. मोठठं गेट ओलांडून दुतर्फा अशोकाच्या झाडांच्या सावलीतून सायकल स्टॅन्ड मध्ये सायकल लावली कि पाय वळायचे कोपऱ्यातल्या वर्गाकडे. एक चेहेरा दिसे पर्यंत सगळ्या खिडक्या धुंडाळुन व्हायच्या. पण दारातून आत जाऊन वर्गावर नजर टाकायची अनावर इच्छा कधीतरीच पूर्ण व्हायची. एक तिरका कटाक्ष व क्षणिक नजरानजर....  गालावरून मोरपीस फिरल्याचा भास.
एखाददुसरा मित्र सोडला तर वर्गामध्ये एवढ्या लवकर कोणीच आलेलं नसायचं. बेंचवर दप्तर ठेऊन पाणी पिण्याच्या निमित्याने एक चक्कर आवर्जून व्हायची कोपऱ्यातल्या वर्गावरून.... तोपर्यंत एक एक भिडू येताना दिसायचा. कधी टोपण नावाने, कधी तीर्थरुपांच्या नावाने तर कधी ....... त्या नावाने एकमेकांना हाक मारत.  वर्गाचा किलबिलाट सुरु व्हायचा. त्यात मुलांपेक्षा मुलिंचाच चिवचिवाट जास्त असायचा हे ओघाने आलंच. म्हणून तर आमच्या वर्गातल्या पहिल्या दोन बाकावर बसणाऱ्या मुलींचे चिमण्या हे बारसे झाले होते. प्रार्थनेची घंटा व्हायच्या आधी मूल्य शिक्षणाचा पाठ दररोज वहीत लिहून पूर्ण करायची शिक्षासुद्धा आम्हाला हवी असायची. .... का काय? ..... नाही कळलं.... 
जाऊ दे. तो पर्यंत घंटा कानावर पडायची व लिखाण आणि बरंच  काही आवरतं घेऊन वर्गात पळायचं. प्रार्थना व्हायची ..

"अहो अजून ती उठली नाही, दात घासून व्हायचे आहेत तिचे, काल स्कुल बॅग सुध्दा नाही भरली तिने. बुटाला पॉलिश तेवढे तुम्ही करा तोपर्यंत मी तिचा डबा आणि वॉटरबॅग भरते. तुमचा नाश्ता तयार आहे.   अहो अजून आरश्या समोर काय करताय, ऐकताय ना...... अहो ऐकलं का मी काय म्हणते ते.. ..आमच्या ह्यांचं हे रोजचच आहे. रोजसकाळी त्या आरश्या समोर उभारून काय करतात देव जाणे. "

सकाळ सकाळची एक रम्य आठवण, रोज आठवणीने येणारी........ आणि माझ हे स्वप्न जणू माझ्या लेकीच्या डोळ्यात असेल जे मोडू नये म्हणून तिला हळू आवाजात हाक मारायला जाणारा मी.

 "पिलू ए पिलू उठ शाळेत जायचं ना"

 

Wednesday 24 January 2018

मन ........


नेमकं काय आहे हे मन?
आणि काय आहे या मनात?
उद्याच्या विचाराने आजच्या आनंदावर विरजण घालणारी कालच्या घटनांची सावली म्हणजे मन?
 की,भविष्यातील वर्तमानांत जगण्याच्या धडपडीत आजच्या वर्तमानाची झालेली क्रूर चेष्टा म्हणजे मन?
की चेष्टे चेष्टेतील मस्करी म्हणजे मन?
मस्करी करणारे मित्रमंडळ म्हणजे मन ?
की, जीवाला जीव लावणारे मित्र म्हणजे मन ?
जीवाला स्थैर्य देणारी मैत्री म्हणजे मन ?
मैत्रीला सार्थ ठरवणारी नुसती साथ म्हणजे मन ?
साथ कुणाची ? स्वत:ची ???
स्वत्वातून स्वत :ची झालेली जाणीव म्हणजे मन ?
की स्वतःचे स्वताला ऐकू येणारे शब्द म्हणजे मन ?
शब्दाना अर्थ देणारे भाव म्हणजे मन ?
भावानांच्या मागून पळायला कमी पडणारे रान म्हणजे मन ?
रानावनात भटकणारे विचार म्हणजे मन ?
की विचारांना  वाट दाखवणाऱ्या आठवणी म्हणजे मन ?
आठवणींवर जगणारे दिवस म्हणजे मन ?
दिवसांवर झुलणारी रात्र म्हणजे मन ?
रात्र रात्रभर पडणारी स्वप्ने म्हणजे मन ?
स्वप्नानां असणारा अर्थ म्हणजे मन ?
की त्यावरून सुचणाऱ्या कल्पना म्हणजे मन ?
की कल्पनेपलीकडील वास्तव म्हणजे मन ?
वास्तवत असणारे प्रश्न म्हणजे मन ?
प्रश्नांची न मिळणारी उत्तरे म्हणजे मन ?
उत्तरे शोधायचा केविलवणा प्रयत्न म्हणजे मन ?
की प्रयत्नांना पडणारी मर्यादा म्हणजे मन ?
मर्यादेचे झालेले उल्लंघन म्हणजे मन ?
की उल्लंघन करायला भाग पडणारी इच्छा म्हणजे मन ?
मर्यादेच्या चौकटीत राहायला भाग पडणारी बंधने म्हणजे मन ?
बंधनेत बांधणारी चौकट म्हणजे मन ?
चौकटीची सीमा म्हणजे मन ?
की सीमेपलीकडील क्षितिज म्हणजे मन ?
क्षितिजाचे आभास म्हणजे मन ?
मन म्हणजे काय या कोड्याची न होणारी उकल  म्हणजे मन ?
की या प्रश्नाचे न मिळणारे उत्तर म्हणजे मन ?
वेदनेपासून मुक्ति म्हणजे मन की वेदनेची जाणीव म्हणजे मन ?
की पुनः पुन्हा स्वताची जाणीव म्हणजे मन ?
???   ??   ?    

नेमके काय आहे हे मन ?