Friday 11 May 2018

आठवण

 आठवण

शाळेच्या बाकावरती बसल्यावर नेहमी बाहेरचे जग सुंदर दिसायच.
नेहेमी वाटायच, की किती छान आहे यांचं जगणं. कधीही, कुठेही, केंव्हाही व कसंही जा, कोणाची आडकाठी नाही की भिती  नाही. कसलंही बंधन नाही. मनसोक्त फिरा. कुठे गेला होतास, कुणा बरोबर होतास, काय करत होतास, प्रश्नांची सरबत्ती नाही. फक्त मुशाफिरी. किती भाग्यवान आहेत हि मोठी लोक. हवे ते कपडे, छान पैकी सायकल (हो..  माझ्या लहानपणी मनासारखी सायकल, हे एक स्वप्नच होत) आणि केसांचा कोंबडा (खेडेकर सरांचा शब्द.  - माझे मराठीचे सर.) करून फिरत असतात. नाहीतर आम्ही, रोज सकाळी सात ते दुपारी बारा पर्यंत शाळेत... आपण पण लवकर मोठं व्हावं, पैसे कमवावे, हवे तसे खर्च करावे.. क्या बात हे!

 पण म्हणून शाळा आवडत नाही, अस अजिबात नाही हं. वर्षातला एकही दिवस कधीहि शाळा चुकवली नाही. अगदी बर नसताना सुद्धा. आई तर अजूनसुद्धा म्हणत असते, बर नसल कि तुला शाळेत जायचा ऊत यायचा. रोज वेळेच्या आधी अर्धा एक तास तरी शाळेत पोचायचो. घरातूनच लवकर बाहेर पडायचं हे ठरलेलंच. त्यासाठी आदल्या दिवशी पासूनच तयारी केलेली. गृहपाठ (हो आम्ही गृहपाठाच म्हणायचो, कारण होम वर्क असा शब्द त्यावेळी मराठी शब्द कोशात समाविष्ट नव्हता. माझी मुलगी मला ठसक्यात ठणकावते ... बाबा गृहपाठ नाही हो होमवर्क करायचा आहे  मला.  आणि हो माझी मुलगी मला बाबाच म्हणते... तिलाही आवडत आणि मला ही.) तर गृहपाठ करून, सर्व वह्या (आताचे नोट बुक ) कंपास पेटी (त्यातही कॅमल ची असेल तर फारच अभिमानाने) पुस्तके दप्तरात (स्कूल बॅग हो बाबा.. इती कन्या..) भरून खिडकीच्या खोबणीत किंवा दाराच्या मागे ठेऊन द्यायचं, म्हणजे सकाळी अजिबात गडबड नाही. अंघोळ एक्दम कोमट पाण्याने. ओलसर केसात थोडेसे खोबरेल तेल भरपूर चोळून लावलेलं. पांढरा शर्ट व खाकी अर्धी चड्डी. तेंव्हा फक्त कॉन्व्हेंटच्या शाळेत मुलांनां फुल्ल पॅन्ट असायच्या. घरापासून शाळा बहुतेक आठ एक किलोमीटर लांब असेल. सायकलमध्ये हवा नेहेमी भरून ठेवलेली. गरम गरम चहाच्या वाफां बघत शिळी चपाती चहात बुडवून खायची सवय तर आम्हां सर्व मुलांमध्ये समान होती. मुलीं बद्दल माहित नाही.... बहुतेक तीच असावी. मुलींशी बोलणे दुरापास्त, तर त्यांच्या सवईंबद्दल माहिती असणे म्हणजे.....
चहा संपला रे संपला की " ए...  आई, येतो ग. ... " " शिस्तीत जा रे, हायवे  वर  सायकल जोरात पळवू नकोस. शाळा सुटली कि सरळ घरी यायचं..."  "बोंबलत फिरत बसू नकोस मित्रांबरोबर" हे वाक्य कंसात असायचे. (आजच्या भाषेत सायलेंट - जस सायकॉलॉजि मध्ये P असत तस )  चाळीतलं घर आमचं. तीन सरळ खोल्या रेल्वेच्या डब्यांसारख्या सरळ. अंगणातले बांबूचे गेट व्यवस्थित बंद केलेले असायचे. आतून व बाहेरून मेंदीची झाड लावून भक्कम केलेलं. दोन बांबू बाजूला सरकवले कि सायकल बाहेर काढून परत गेट बंद करायचा हा शिरस्ता नाहीतर गुरं आत येऊन शेणाने सारवलेलं अंगण उकरून ठेवणार हे ठरलेलं. तस  बघितल तर अंगण करायचं म्हणजे माती उकरून त्यात पाणी मारून धोपटण्याने धोपटून धोपटून एक सारख केल जायचं. नंतर मग चाळीतल्या सर्व बायका एकत्र येऊन ते शेणाने सारवून घ्यायच्या. अर्थात हे शेण आम्हीच सर्व मुलांनी आसपासच्या चौंडयातून गोळा केलेलं. चौंडा म्हणजे शेताचा तुकडा, कोकणात जमीन माणसांसारखी स्वतंत्र व्यक्तिमत्वाची ना, त्यामुळे वेगळीवेगळी, तुकड्या तुकड्यांची. अंगण करायचा कार्यक्रम हा ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात दर वर्षी ठरलेला.  मुलांना हुंदडायला भरपूर जागा मिळावी म्हणून.
एकदा का सायकलला टांग मारली कि चाळीतून बाहेर पडून एकच माणूस जाऊ शकेल अशी पायवाट ओलांडायचो . दोन चौंडयांना वेगळं वेगळं करणारा मातीचा बांध म्हणजे आमचा रस्ता. त्यावरून जोरात सायकल पळवत मुख्य रस्त्यापर्यंत यायचं. मग यायचा मेन रोड. मुंबई हायवे. त्यामुळे रहदारीचा. शाळेपर्यंत पोचताना दोन मोठे नाके लागायचे. तिथून सायकल फिरवायला  जास्त मजा यायची. वाटेत एक मोठे कॉलेज लागायचे... तमाम शाळकरी वर्गबंधूंचे आकर्षण. मुलं मुली एकत्र बोलताना पाहून हुरळून जाणारे आम्ही सर्व शाळकरी जीव. तिथे आपसूक पाय रेंगाळायचे. सायकलची गती (सॉरी स्पीड ) आपोआप कमी व्हायची. आज काय छान  बघायला मिळतंय का याची उत्सुकता व ती घटना वर्ग सुरु झाल्यावंर बाकबंधूला (आजच्या भाषेत बेंच मेट) सांगायची अनावर इच्छा. एकदा का ते कॉलेज मागे सरले कि आपोआप सायकलचा वेग वाढायचा. आपल्याच वेगाने जाणारा एखादा सायकलस्वारांचा  घोळका ओलांडून पुढे जायची उर्मी. मोठठं गेट ओलांडून दुतर्फा अशोकाच्या झाडांच्या सावलीतून सायकल स्टॅन्ड मध्ये सायकल लावली कि पाय वळायचे कोपऱ्यातल्या वर्गाकडे. एक चेहेरा दिसे पर्यंत सगळ्या खिडक्या धुंडाळुन व्हायच्या. पण दारातून आत जाऊन वर्गावर नजर टाकायची अनावर इच्छा कधीतरीच पूर्ण व्हायची. एक तिरका कटाक्ष व क्षणिक नजरानजर....  गालावरून मोरपीस फिरल्याचा भास.
एखाददुसरा मित्र सोडला तर वर्गामध्ये एवढ्या लवकर कोणीच आलेलं नसायचं. बेंचवर दप्तर ठेऊन पाणी पिण्याच्या निमित्याने एक चक्कर आवर्जून व्हायची कोपऱ्यातल्या वर्गावरून.... तोपर्यंत एक एक भिडू येताना दिसायचा. कधी टोपण नावाने, कधी तीर्थरुपांच्या नावाने तर कधी ....... त्या नावाने एकमेकांना हाक मारत.  वर्गाचा किलबिलाट सुरु व्हायचा. त्यात मुलांपेक्षा मुलिंचाच चिवचिवाट जास्त असायचा हे ओघाने आलंच. म्हणून तर आमच्या वर्गातल्या पहिल्या दोन बाकावर बसणाऱ्या मुलींचे चिमण्या हे बारसे झाले होते. प्रार्थनेची घंटा व्हायच्या आधी मूल्य शिक्षणाचा पाठ दररोज वहीत लिहून पूर्ण करायची शिक्षासुद्धा आम्हाला हवी असायची. .... का काय? ..... नाही कळलं.... 
जाऊ दे. तो पर्यंत घंटा कानावर पडायची व लिखाण आणि बरंच  काही आवरतं घेऊन वर्गात पळायचं. प्रार्थना व्हायची ..

"अहो अजून ती उठली नाही, दात घासून व्हायचे आहेत तिचे, काल स्कुल बॅग सुध्दा नाही भरली तिने. बुटाला पॉलिश तेवढे तुम्ही करा तोपर्यंत मी तिचा डबा आणि वॉटरबॅग भरते. तुमचा नाश्ता तयार आहे.   अहो अजून आरश्या समोर काय करताय, ऐकताय ना...... अहो ऐकलं का मी काय म्हणते ते.. ..आमच्या ह्यांचं हे रोजचच आहे. रोजसकाळी त्या आरश्या समोर उभारून काय करतात देव जाणे. "

सकाळ सकाळची एक रम्य आठवण, रोज आठवणीने येणारी........ आणि माझ हे स्वप्न जणू माझ्या लेकीच्या डोळ्यात असेल जे मोडू नये म्हणून तिला हळू आवाजात हाक मारायला जाणारा मी.

 "पिलू ए पिलू उठ शाळेत जायचं ना"

 

4 comments:

  1. खूप सुंदर ! शाळेची आठवण आली ...ते दिवस आठवले जे विस्मरण झाले होते.
    लिहित रहा ...अल्ल the best!

    ReplyDelete
  2. खूप सुंदर लिहिलंय खरंच शाळेचीच आठवण झाली.

    ReplyDelete