Thursday 12 September 2019


!! गणपती बाप्पा मोरया. !!

प्रचंड धावपळ चाललेली आणि मनात धाकधूक.
ह्या वर्षी आपल्याला गणपतीची मूर्ती आणायला जमणार नाही.
आपण इकडे, आई, बाबा तिकडे.
 त्यांना मूर्ती आणण, बसवणं सगळं जमणार नाही.
त्यापेक्षा मातीचा गणोबा बसवू. आणि रोजच्या पूजेतील बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करू.
कसतरीच वाटत होत पण काहीच इलाज नव्हता.
आता पुढे काय करायचं आणि कसं करायचं याचे आराखडे मनातल्या मनात बांधत त्याचा प्रवास चालू होता.
पावसाने तर थैमान घातलाय. हा पण माझीच परीक्षा बघतोय? आणि तीही आत्ताच.
सांगलीतून गाडी सुटली पण अहमदाबादला कधी पोहचेल देव जाणे. गाडी आली हेच नशीब. तब्बल पाच तास उशिरा. गाडी कॅन्सल झाली नाही, उशिरा का होईना पण आली आणि परत अहमदाबाद्ला जायला निघाली... केवळ दैव बलवत्तर म्हणून. ड्राइवर म्हणाला पाच तास बडोद्यामध्ये गाडी अडकली होती. "सेठ को बोला वापीस अहमदाबाद को लेता हूँ, तो  वो उखड गया, सालेने मना किया" तिथली परिस्थीती त्या सेठला काय माहित असणार म्हणा? .मोठ्या धाडसाने त्याने बस बाहेर काढली असणार. "हॅट्स ऑफ डिअर".ड्रायव्हरचे मनातल्या मनात त्याने आभार मानले. तो सांगलीतुन अहमदाबादला जायला निघालेला. आई बाबां सांगलीत आणि बायको व कन्या अहमदाबादेत.

 बायकोने कमीत कमी शब्दात सांगितलं होत,  "पाणी भरलय, पार्किंग लॉट पाण्याखाली आहे, दोन दिवस लाईट नाही, चार्जिंग संपत आलाय , नेटवर्कपण मिळत नाही, प्यायचं पाणी आणि खर्चाचं पाणी संपलंय  अपार्टमेंटमधील सर्वानी आपापल्या गाड्या बाहेर काढल्यात, आपलीच गाडी खाली अडकलीय" फोन कट झाला ...  " अशातच भरीस भर म्हणजे, ह्यावेळी आपण इन्शुरन्स काढलेला नाही?" त्याच मन त्याला स्वस्थ बसू देत नव्हतं.

 "पाणी अजून ओसरल असेल का? हायवेला उतरलो तरी घरापर्यंत पोचता येईल का?" ह्या प्रश्नांनी तो परत भानावर आला.
किती विचार येत होते मनात आणि तेव्हढ्याच समर्थपणे तो त्या विचारांना टोलवत होता.

 तीन दिवसांसाठी म्हणून घेतलेली सुट्टी आता तब्बल बारा दिवसांची झाली होती. ऑफिस मध्ये कारण देऊन तो मेटाकुटीला आला होता. अजून इथल काम संपलेलं नव्हत... अर्धवटच होत.. महत्वाचे निर्यय घ्यायचे होते. दोन दिवस बायकोचा फोन लागत नव्हता, व्हाट्सअँप पण बंद होत. आणि अचानक शेजारील पटेल भाईचा मेसेज आला. "भाभीजी का मोबाइलला डिस्चार्ज हुवा हैं. इसलिये मुझे आपको बोलने के लिये कहा हैं. हम लोग हैं यहाँ,आप फिक्र मत करो."
पोचला हायवेला. रस्ता बंदच होता. रिक्षावाल्याने सात किलोमीटर लांबून फिरवून घरी पोचवलं. काहीही न बोलता, कसलीही तक्रार न करता कामाला जुंपून घेतल त्यानं. घरी फोन करुन सांगितलं व्यवस्थित पोचलो आणि इथही व्यवस्थित आहे.
कन्येची शाळा बंद होती. मित्रांना फोन करून मोबाइल चार्जिंगची व्यवस्था केली, अंघोळीची, पिण्याच्या पाण्याची तजवीज , दोनचार दिवसांठी जेवणाचा डब्बा लावला, गाडी पाण्याबाहेर काढून टोविंग करून सर्विसिंगला पाठवली.. इन्शुरन्स नसल्यामुळे जो होईल तो खर्च मान्य केला पण गाडी कधी मिळेल याची शाश्वती नाही हे मान्य करूनच. पाणी ओसरल पण लाईट यायला पाच दिवस लागले. सगळीकढेच पाणी भरल्यामुळे ऑफिस बंदच होत. हेच एक काय ते मनासारखं.
पण सांगली कोल्हापूर अजूनही  पाण्याखालीच होते. चारही बाजूनी संपर्क तुटल्यामुळे परत तिथे जण शक्य नव्हतं पाणी ओसरून वाहतूक सुरु होण्याची वाट बघणे हेच हातात होत.
सांगलीतले  बारा दिवस क्षणभरात त्याच्या डोळ्यासमोरून गेले.
"मी आलो कि लगेच दवाखान्यात जाऊ. डॉक्टर काय म्हणतात ते पाहून ठरवू" त्याने आईला समजावलं आणि फोन ठेवला होता. तिथली दृश्य त्याला परत, परत आठवत होती. पायाला झालेली जखम बरी होत नाही तेंव्हा पायासाठी अँजिओग्राफी करू, तसच मग हृदयाची पण करून बघू कारण पुढ काही धोका आहे की नाही हे कळेल. असा विचार करूनच तो बाबांना घेऊन दवाखान्यात गेला होता.

 दोन तासात ट्रीटमेंट होऊन दुपार पर्यंत बाहेर पडाल अस ऐकून सकाळी नऊ वाजता गेलेले ते, रात्री अकाराला घरी पोचले.तो सोडून सर्वजण आनंदी कारण फक्त पायात ब्लॉकेज आहे आणि एक साधी शस्त्रक्रिया केली की झालं. काळजी करण्यासारख काही नाही. बायकोला पण तेच सांगितलं म्हणजे ती अहमदाबादला निर्धास्त.

"आई आज ती सीडी मिळणार आहे, चल आपण जाऊन घेऊन येऊ. दवाखान्यातून येताना तुला भाजी आणि फळं दोन्ही आणता येतील". कदाचित आईच्या मनात पाल चुकचुकली असणार! कारण काहीही न विचारता ती चल म्हणाली. वडील पण पेपर वाचण्याच्या निमित्याने बाहेर सोफ्यावर येऊन बसले.

"युनिव्हर्सिटी कडून जाऊ म्हणजे ट्राफिक लागणार नाही आणि वाटेतच तुला भाजीवाले आणि फळवाले पण दिसतील." गाडी सुरु करता करता तो म्हणाला. "सगळं ठीक आहे ना रे?" आईने काळजीच्या स्वरात विचारले. तिचा अंदाज खोटा नव्हता. दवाखान्यातून येताना झालेला उशीर आणि काळजीचे काही कारण नाही ग आई ह्या त्याच्या उत्तराने, काही तरी आहे हे तिने ओळखल होत. त्याची आईच ती, त्याला ओळखणारच ना!

"पायात ब्लॉक आहे आणि हृदयात पण". काल डॉक्टरांनी जेंव्हा मला आत बोलावलं होत तेंव्हा सांगितलं कि "तीन ब्लॉकेजेस आहेत हृदयात. ट्रिपल व्हेसल डिसीज. ब्लोकेजेसचे प्रमाण पण जास्त आहे ९०%. लवकर निर्णय घ्या. प्रायोरिटी ठरवा! आधी पायावर उपचार करणार कि आधी हृदयावर?"
बाबांचं नशीब खूप चांगल आहे.  की एव्हडं ब्लॉकेज असूनही काही धोका अजून जाणवला नाही. सुदैवाने आपल्याला लवकर कळलंय तेंव्हा प्रत्यक्ष हार्ट अटॅक येईस्तोपर्यंत वाट न बघता आपण लवकर ट्रीटमेन्ट चालू करू. कारण जर अटॅक आला तर तो सौम्य नक्कीच नसणार, ब्लोकेजेसच प्रमाण जास्त आहे आणि जी हानी होईल ती न भरून निघणारी असेल.

आईने डोळ्यातील पाणी अत्यंत प्रयत्नपूर्वक लपवले. क्षणभर मुलाची परिस्थिती तिच्या लक्षात आली.  तो वयाच्या मानाने काल पासून किती समजूतदारपणाने वागतोय , परिस्थितीने आलेलं शहाणपण नाही हे.. तो आहेच तसा कणखर.

"मग आता आपण कस करूया?" नकळत तिने प्रश्न केला. "सर्व ठीक होईल ग आई, चल आपण डॉक्टरना तर आधी भेटू." दवाखान्याजवळ गाडी थांबवत तो म्हणाला.दोघेही गडबडीने दवाखान्यात शिरले. आईला जिने चढता येणार नाहीत हे ओळखून तिला तिथेच रिसेप्शन जवळ बसवून तो दुसऱ्या मजल्यावरील ऑपेरेशन थिएटरला  गेला. पाचेक मिनिटात तिला घेऊन डॉक्टरना भेटायला वरच्या मजल्यावर पोचला.
"बायपास हा आमचा पहिला पर्याय आहे कारण तिन्ही नलिकांमध्ये ब्लॉककजे चे प्रमाण जास्त  आहे. लवकरात लवकर निर्णय घ्या" डॉक्टर काळजीच्या स्वरात म्हणाले. "डॉक्टर दुसरा काही पर्याय?" त्याने हिम्मत करू विचारलं. "ऍंजिओप्लास्टी करता येईल पण काही ठिकाणी औषधाने मॅनेंज करावं लागेल आणि स्टेंट्स पण जास्त लागू शकतील..."
दोघे सीडी घेऊन बाहेर आली. तो म्हणाला "आपण अजून एक दोन तज्ञ डॉक्टरांचे सल्ले घेऊ मगच निर्णय घेऊ." भाजी घेत असताना आई म्हणाली "आपण मोठ्या काकांना सांगू सर्व आणि मगच सेकंड ओपिनियन साठी जाऊ".  " एकदम माझ्या मनातला बोललीस आई, मी पण हाच विचार करत होतो." मग बेळगाव मधील एक प्रसिद्ध हृदयरोगाचे सर्जन आणि कोल्हापूर मधील अजून दोन तज्ज्ञांचे सल्ले घेतल्यावर ते अँजिओप्लास्टीच्या निर्णयावर आले. दिवस ठरवला पण अहमदाबाद मधील पाणी भरल्याच्या बातमीने त्याला तातडीने जावेच लागले, तिथली परिस्थीती पण थोडी गंभीरच होती म्हणा.

सांगलीकडे जाणारे रस्ते खुले झालेत आणि वाहतूक पूर्वपदावर आली हि बातमी कळाताच त्याच दुपारच्या गाडीने बायको आणि मुलीला घेऊन तो पुन्हा बाहेर पडला. मुलीची शाळा, स्वतःचे ऑफिस ---- जे होईल ते बघून घेऊ आता या क्षणाला फक्त ऑपेरेशन महत्वाचं... त्याने स्वतःला परत बजावलं.
डॉक्टरना भेटला, दिवस आणि वेळ ठरली. आदले दिवशी दवाखान्यात दाखल झाले. टेस्ट्स केल्या. उरलेल्या टेस्ट्स दुसऱ्यादिवशी करून अँजिओप्लास्टीसाठी बाबांना ऑपेरेशन थिएटर मध्ये घेतलं. "कॉम्प्लिकेशन बघता एक, किंवा दोन किंवा चारसुद्धा स्टेण्ट लागू शकतील." त्यांनी डॉक्टरांना होकार दिला. तासाभरात डॉक्टरांनी परत आत बोलावलं. "एका स्टेण्टवरच काम झालं. काळजी करण्यासारखं काही नाही. दोन दिवस बाबा देखरेखीखाली राहू देत, मग घरी सोडू...."

खूप प्रचंड ताण एक्दम नाहीसा झाला. "आता सहा एक महिन्यांत पायाचा पण असाच इलाज  करू. म्हणजे सगळं व्यवस्थित होईल". डॉक्टरांचे शब्द कानी पडताच मागील महिन्याभराची धावपळ सार्थकी लागल्याचे समाधान त्याच्या चेहऱ्यावर झळकले. एक आठवड्यात वडिलांचे पहिले चेकअप करून, ऑल इस वेल ऐकून अहमदाबादला परत जाण्याचे बस बुकिंग करण्याच्या मार्गी लागला. ह्या सगळ्या गडबडीत, वडिलांची औषध, त्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा पाळणे, ह्यात पंधरा दिवस कसे गेले ते कळलेच नाही. गणपतीची तयारी करायलापण वेळ मिळाला नाही. दुसऱ्या दिवशीचे गाडीचे बुकिंग करून, सामानाची बांधाबांध करत असताना मुलगीचा छोटासा अपघात, जीवावर आलेलं पायावर निभावलं. पळत असताना समोरून येणाऱ्या रिक्षाला धडकली. ड्राइवरने वेळीच ब्रेक मारला. उजव्या  पायाचा घोटा पूर्णपणे सोलून गेला.

नवीन जबाबदारी  बरोबर घेऊन परतीच्या प्रवासाला सुरवात. पण गणपती ह्यावेळी कसा बसवायचा हा प्रश्न कायमच होता. पुढच्याच आठवड्यात प्रतिष्ठापना होती. सुट्टी मिळण्याचे एकही कारण शिल्लक नव्हते आणि सगळ्या सुट्ट्या पगारी रजा धरून, केंव्हाच संपल्या होत्या.
त्यामुळे मातीचा गणोबा बसवूया आणि रोजच्या पूजेची चांदीच्या मूर्तीची स्थापना करूया, म्हणजे आई आणि बाबा दोघेही सगळं सांभाळतील. ठरलं तर मग सगळ्यांचं. गाडीत बसल्यावर थोडं समाधान थोडं चुकल्यासारखं... पण बाबांची ट्रीटमेंट व्यवस्थित झाल्याचं समाधानच जास्त महत्वाचं. त्रिकोणी कुटुंब घरी परतलं... मुलीच्या पायाची काळजी करत

गौरी गणपतीचा दिवस आला. घरी बोलणं झालं. बोलण कसलं? विडिओ कॉल. छोट टेबल सजवलेलं त्यावर पाट मांडून, गणोबा आणि पूजेची गणपतीची मूर्ती विराजमान झालेली बघितली. वडिलांची तब्येतपण एक्दम व्यवस्थित. औषध, पथ्य सर्व वेळच्यावेळी होत होती हे बघितलं.... विडिओ कॉलने खरंच घराबाहेर, दूरवर राहणाऱ्या मुलांची खूप छान सोय केलीय..
छोटासा गणोबा, गणपतीची पूजेची मूर्ती बघून लेकीचा हट्ट सुरु झाला, बाबा मोठा गणपती आणूयाना . हो रे राजा आणूया आपण, पण पुढच्या वेळेला. आबा कस जाणार सांग एवढ्या लांब मूर्ती आणायला, आणि विसर्जनाला पण कस जाणार सांग. आणि आत्ता बघितलास ना तू छोटा गणोबा. त्याच पण खूप महत्व असत आणि आपण तो बसवलाय ना... मग.

परत पंधरा मिनिटांनी लेक लंगडत लंगडत फोन घेऊन आली. "बाबा, आजीने परत विडिओ कॉल करायला सांगितला आहे, लावा ना".  "आण इकडे लावतो. आरती करायची असेल ना आबांना. चला आपणपण आरती म्हणू त्यांच्या बरोबर".
विडिओ कॉल आईने उचालला, पाहतोय तर काय..... मखरात शाडूची सुंदर मूर्ती विराजमान झालेली... आबा आणि आज्जी हसतमुखाने पूजेच्या तयारीत.   आई हा काय प्रकार, पंधरा मिनिटांपूर्वीच आपण बोललो आणि छोटी चांदीची मूर्ती म्हणजे रोजच्या पूजेची मूर्ती होती ना तिथे, मग आता हि मोठी मूर्ती कुणी आणली??

"अरे नमूच्या आईने आणली. आपला विडिओ कॉल झाल्यावर मी पूजेची तयारी करायला म्हणून उठले तोच बेल वाजली. दरवाजा उघडला तर नमुची आई गणपतीची मूर्ती आणि नमुला घेऊन हजर. तुम्हाला विचारत बसले असते तर तुम्ही नकोच म्हणाला असता. म्हणून मी आणि नमु दोघी गेलो गणपती आणायला. पहिल्यांदा नेहेमीची मूर्ती पसंद केली मग लक्षात आलं कि दादा आणि सुनबाई तर तिकडे, विसर्जनाला आबांना कस जमणार? मग शाडूची मूर्ती घेतली. म्हणजे विसर्जन घरीच करता येईल तुम्हा दोघांना. आणि विसर्जन केल्यावर त्या मातीतून झाड पण उगवेल बाप्पाचा प्रसाद म्हणून. मग काय घेतली हि मूर्ती आणि आलो घेऊन. तुम्ही नाही म्हणूच शकणार नाही.. आणि गणपती पाटावर ठेऊन त्या दोघी त्यांचा गणपती आणायला गेल्यापण. आज संध्याकाळची भांडी घासायला आणि स्वयंपाक करायला थोड्या उशिरा येईन काकु, अस म्हणत बाहेर पडल्य दोघी, तशाच अनवाणी पायाने कारण आता त्यांना, त्यांचा बाप्पा घरी आणायचा होता ना"...
आम्ही सारेच निशब्द.. बाप्पाच तो... बाप आहे तो आपला.. न मागता सर्व काही देतो याची वारंवार प्रचिती येती ती अशी.
सगळ्यांच्याच डोळ्यात आनंदाश्रू...
"थांब आई, आधी नमूच्या आईला कॉल करतो मग आपण आरती करू"
"गणपती बाप्पा मोरया, नामूच्या आई... तुषार बोलतोय अहमदाबादहून... आज बाप्पा आम्हाला पावला. स्वतःहून आलाय आमच्या घरी......" "गणपती बाप्पा मोरया"
तुषारदादा इकडची काळजी करू नका तुम्ही. आम्ही इथे असेतोवर तर अजिबात काळजी करायची नाही....दोन दिवस झाले रोज चुकल्यासारखं वाटत होत, गणपतीची तयारी दिसत नव्हती घरात आणि आज काकू म्हणाल्या कि रोजच्या पूजेची मूर्ती आणि गणोबा बसवणार आम्ही ह्यावेळी. .. मलाच कसतरी झालं. मग ठरवलचं, आपणच  बसवू गणपती काकूंच्या घरी"
आमची गौराई बोलत होती... डोळ्यात आनंदाश्रू येत होते आणि बाजूला लेकीचा जयघोष सुरु होता " गणपती बाप्पा मोरया.. गणपती बाप्पा मोरया..."-------------------------- केदार प्रकाश  पाटील.








No comments:

Post a Comment