Sunday 28 May 2017







कुणासाठी कुणीतरी काहीतरी केल.
का केलं ? कस केलं ? कशासाठी केलं ?
       करून करून कधीतरी केंव्हातरी केलं,
        कुणामुळे केलं तरी केव्हढंतरी केलं.
काय केलं काय करता ? काय नाही केलं ?
काही जरी केलं तरी काही कमी नाही केलं.
        काही नाही करत करत केव्हढतरी केलं,
कशासाठी केलं ? कुणी  का ? कस केल?

Monday 15 May 2017

सहवास...


सहवास असावा हवाहवासा,
नको दुरावा दुःखाचा.
दुःख प्यावे दुधापरीते,
लवलेश नसावा क्लेशाचा.

बंद नसावे द्वार मनाचे,
नात्यांचेही असे तसे. 
बंधनात ती भली खुशाली,
नात्यांचेही असे तसे.

विरह न व्हावा कधीही,
ना विरहाची  वेदना. 
प्रेमाने जग जिंकावे,
चिरतरुण मनी भावना,

दाटुनी येई कंठ ,
बरसेल  मेघ न गरजता.
रिचवले कोण हलाहल?
अनुत्तरित तोही विधाता.

भले बुरे जे असे भोवती,
अधुरे असे ते तुझ्याविना,
सप्तसुरांची जमली मैफल,
पण साज चढेना तुझ्याविना.

 
 


Wednesday 10 May 2017

ऋणानुबंध...



कळत नकळत कधी अचानक,
जुळतात अशी ही नाती,
सहवास यांचा हवाहवासा,
जशी पावसात दरवळणारी माती.
              ऋणानुबंध म्हणू की यांना स्वर्गातील रेशीमगाठी,
               कुणीही नाही कुणाचे तरीही जगतात एकमेकांसाठी.
अंत न पाही विरह हा केवल,
स्वप्नही सलते कणकण रतिभर,
कुठे खोलवर जखम जन्मभर,
निशब्ध ओठ, मनाचे ओघळ...
                तो स्पर्शही असे मखमलीचा,
                चंदन गंधित अत्तर ल्याला,
                डोळा साठवुन ठेवी काही,
                निधडी छाती बोले केवळ.
अबोल निर्झर न राही अंती,
ढग स्पर्शूनही जाई माती,
अलगद हळुवार मोरपिसासम,
आठवण ठेऊनी जाती.
               कळत नकलत कधी अचानक,
               जुळतात अशी ही नाती,
               सहवास यांचा हवाहवासा,
               जशी पावसात दरवळणारी माती.


 

Thursday 4 May 2017

एक छोटासा प्रयत्न 


असाच मी,  अशीच तू, असेच हे जगायचे. 
अशाच या क्षणात मी असायचे नसायचे. 

रंग लावतो तुला, मनात मी नटायचे,
स्मरायच्या तुझ्या छटा,  नी गाली तू खुलायचे 
आज या क्षणात मी फुलाविना फुलायचे 
असाच मी,  अशीच तू, असेच हे जगायचे. 
अशाच या क्षणात मी असायचे नसायचे.

तिथेच मी पुन्हा तुला किती बरे शोधायचे,
का ? कसे ? मी मला पुन्ह पुन्हा समजवायचे ?
फक्त एक श्वास तोच, राजरोस लढायचे ?
मी नसे, तू नसे, मग  सांग कुणी हरायचे ?
असाच मी,  अशीच तू, असेच हे जगायचे. 
अशाच या क्षणात मी असायचे नसायचे.