Sunday 22 July 2018

सहजता

कस असता ना, एखादी गोष्ट सहज मिळाली, त्यासाठी काही कष्ट करायला लागले नाहीत की आपण त्याकडे गांभीर्याने पाहत नाही. हे काय होणारच होत, अस म्हणून त्या गोष्टीकडे कानाडोळा करतो. पण जेंव्हा साध्यासाध्या गोष्टीसुद्धा आपल्याला वाकुल्या दाखवतात, किंवा आपल्या मनाप्रमाणे होत नाहीत, किंवा होणार होणार म्हणत असताना घडून येत नाहीत तेंव्हाच आपल्याला त्यांचे महत्व कळते. या छोट्या छोट्या गोष्टीच आपल्याला जीवन कस जगायच हे शिकवतात. आपल्याला जीवनाचे धडे देतात. आपले जीवन समृद्ध करतात. फक्त आपण त्यांच्याकडे डोळे उघडे ठेऊन बघितलं पाहिजे. त्याना कमी न लेखता, आपुलकीनं त्यांच स्वागत करून, त्यांना गोंजारून, जर विचारलं की, " अरे बाबा, आज कस येण केलस तू? आज काही  विशेष आहे का?" मग बघा ती छोटीशी  गोष्ट कशी साखरेसारखी पटकन विरघळून जाते व त्या घटनेचा खरा अर्थ आपल्याला उलगडून दाखवते.
उदाहरण म्हणून एक छोटासा किस्सा सांगतो. माझ्याच मित्राने मला ऐकवलेला. "अरे परवा छोकरा शाळेत जायला नाही म्हणत होता, रडून रडून घर डोक्यावर घेतल त्याने. कारण काहीच नव्हतं, सकाळ सकाळची वेळ यार? मग काय दिले फटके. कदाचित जरा जास्तचं  मारले असतील  रे, कारण बायकोने पटकन हात अडवला माझा . पोर पण हुमसून हुमसून रडलं. लहान असल्यामुळे त्याने मुकाट्याने मार खाल्ला. उलट सुद्धा बोललं  नाही. रडत रडत आवरलं आणि रडतच शाळेत गेलं." कदाचित माझा अहंकार क्षणिक सुखावला असेल त्याला फटकारल्यावर." मी जरा चुकलोच होतो हे आतून जाणवत होत, पण ती वेळच अशी होती की काय करणार. नेहमीप्रमाणे आवरल आणि गेलो ऑफिसला. कामाच्या धबडग्यात विसरून गेलो सकाळची घटना. तस पाहिलं तर क्षुल्लक घटना. संध्याकाळी नेहमीप्रमाणे साडे आठच्या सुमाराला पोचलो घरी. नेहमी सारखा दंगा नाही, टीव्ही सिरियलचा आवाज नाही, कानावर काहीच येत नव्हत. बायको म्हणाली "अहो आज त्याला शाळेत लागलं बघा, जरा कमी डोळा वाचला. आत झोपलाय आल्यापासून " काळजात धस्सं झालं. पायातले बूट पण न काढता तसाच आत पळालो. बघितलं तर डाव्या कुशीवर अंगाचे मुटकुळे करून चिरंजीव झोपले होते. अंग पण गरम लागत होत. हनुवटीला धरून चेहेरा माझ्याकडे फिरवून बघितला तर खरंच डोळ्याच्या खाली काळ निळं झाल होत. नाक सुजल्या सारख झाल होत. पुन्हा पुरुषी अहंकार जागा झाला. बायकोवर डाफरणे सुरु झालं. "तू मला का कळवलं नाहीस?, शाळेत विचारलस की नाहीस? इतक लागल पण मला कळवावे अस वाटलं नाही का तुला? जे तोंडाला येईल ते बोलत गेलो. बायको मात्र शांत होती. थोड्या वेळाने बडबड शांत झाल्यावर म्हणाली, "जरा मोबाइल बघा किती मिस्ड कॉल आहेत ते?" खरंच पंधरा ते वीस मिस्ड कॉल होते. साडेतीन ते साडेसहा या दरम्यानचे. माझ्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाच्या मीटिंगमध्ये असल्यामुळे बायकोचा कॉल घेणे, अथवा नंतर परत कॉल करून तिला विचाराणे  की तू कॉल का केला होतास हे मी नेहेमीच टाळत आलोय याची प्रखर्षानें जाणीव झाली.
"आल्यापासून सारखा रडत होता, बाबांना सॉरी म्हणायचं आहे, मी काही नाही केलं ग,फोन लावून दे, त्यांनाच  सगळं सांगतो म्हणून हट्टून बसला होता. काय झालाय ते मला सांगायला तयार नव्हता. कशी तरी समजूत घातलीं, डोळ्याखाली औषधं लावलं , नाकावर औषधं लावलं, बाबा आज लवकर घरी येणार आहेत आल्याआल्या तू त्यांना सॉरी म्हण हं, अस म्हटल्यावर कुठे त्याची समजूत पटली. मग सगळं सांगितलं.  दुपारच्या सुट्टीत पाणी पिताना दुसरी मूल भांडत होती, त्यातल्या एकाचा ह्याला धक्का लागला. नळावर तोंड आपटलं मित्रांनीच मॅडमकडे नेलं, औषध लावल हे सगळं त्याला तुम्हालाच सांगायचं होत. आल्यावर जेवला नाही, दुधपण नाही घेतल, तसाच पडून होता. बाबा तुझा फोन पण उचलत नाहीत, अजून माझ्यावर रागवलेत आणि माझ्या डोळ्याला लागलाय म्हटल्यावर अजून चिडतील. तू आत्ताच फोन लावून दे मी सांगतो त्यांना सर्व काही. मीच मग कशीतरी समजूत काढलीं अरे बाबाना खूप काम असत, दुपारचं जेवण पण ते कधी वेळेवर घेत नाहीत, मीटिंग मध्ये असतील ते आपण नको त्यांना त्रास द्यायला. आपल्या मुळे त्यांचे सर त्यांना ओरडू देत का? आणि तू जर औषध नाही लावून घेतलस तर त्यांना अजून राग येईल हं. अस म्हटल्यावर जरा कुठे पटलं त्याला. औषध लावून घेतलं, पण दवाखान्यात यायला तयार नाही झाला. बाबांच्या बरोबरच जाईन म्हणाला. काहीही न खाता तसाच झोपला बघा."
मी तरी काय बोलणार, मीच प्रत्येक ठिकाणी चुकलो होतो रे, सकाळी पण त्याला उगाच मारलं. त्यालासुद्धा आतून काही तरी होत असेल म्हणूनच तो आज शाळेत जायला नको म्हणतोय हे मला कळलंच नाही. दोन फटके दिले कि पोरं ऐकतात, नाहीतर प्रत्येक गोष्ट त्यांची ऐकली कि शेफारतात हे ड़ोक्यात अगदी फिट्ट बसलय ना. त्यात सकाळी ती सुद्धा मला काही बोलली नाही फक्त हात अडवला तिनं. तेंव्हा पण माझ्या काही लक्षात आलं नाही. तिचे दुपारी इतके कॉल येत होते, मी नेहेमी प्रमाणे उचलले नाहीत. नेहमी प्रमाणे रोजच्याच काहीतरी कटकटी सांगायला फोन केला असेल म्हणून दुर्लक्ष्य केलं, आणि नंतर फोन करून तिला विचारलपण नाही. हेच जर मी तिचा कॉल उचलला असता किंवा थोड्या वेळाने तिला परत कॉल केला असता तर पटकन घरी जाऊन त्यांना दवाखान्यात नेता आल असत. पण नाही, स्वतःचा अहंकार जपायचा होता ना मला. पण हेच जर ती अस वागली असती तर मी तिला माफ केलं असता का? तिनं किती सहजतेनं मला माफ केलं ? आमच्या बोलण्याने तो जागा झाला होता. त्या दोघांच्या देखत स्वतःचे डोळे ओले आहेत हे स्वीकारणेपण मला जड  झालं. मला बघताच माझ्या गळ्यात पडून तो न केलेल्या चुकी बद्दल सॉरी म्हणून हुमसून हुमसून रडायला लागला. त्याला समजावणं मलाच अवघड होत, पण नेहेमीप्रमाणे तीच पुढे आली, त्याला पटकन उचलून म्हणाली, " अरे ते तुझ्यावर नाही , माझ्यावर चिडलेत, इतका वेळ त्याला डॉक्टरकडे का नेलं नाही म्हणून.? आणि हळूच मला खुणेंन तयारी करायला सांगितली.
आता मात्र माझी मलाच लाज वाटायला लागली, एवढस पोरं सकाळी मार खाऊन शाळेत गेलं. शाळेत धडपडल, जरा कमी डोळा वाचला त्याचा. आणि एवढ सगळं होऊन, मी मारलेलं विसरून, बाबाना काय वाटेल याची चिंता करत होत.  बाबानी उगाचच मला फटके मारलेत हे विसरून त्यानं मला नकळत माफही केलं होत, बायको सुद्धा सकाळी काही म्हणाली नाही, तुम्ही चुकलात त्याला मारायला नको होत, तुमच्या मुळेच हे सार घडलं, आज एक दिवस पोर शाळेत गेलं नसत तर काय बिघडलं असत?, एक साधा फोन तुम्ही उचलू शकत नाही?, असं काय जगा वेगळं काम तुम्ही करता? आणि फोन उचलायला नाही जमलं त्या वेळी तर नंतर तरी करू शकता कि नाही? ह्यातलं एक हि अक्षर न बोलता, चूक माझ्याकडून घडलेली असताना सुद्धा त्या बद्दल एक अक्षरही  न बोलता ती अतिशय समजुदारपणे ह्या प्रसंगात मला सावरत होती. कुठल्याही मनजेमेंटचे कोर्स न करता ही घटना ती हळुवारपणे पण समर्थपणे सांभाळत होती.
"सांग मला, आता एवढं शिकून, कॉर्पोरेटमध्ये काम करुन पण आपण कसं वागतो? आणि घरातली सगळी कशी वागतात? कोण समजुद्दार आहे आपण की ते?" हा प्रश्न माझ्या साठी होता हे मला कळायला थोडा उशीर झाला. अस वाटत होत कि जणू मीच त्या प्रसंगात आहे आणि मित्राऐवजी मीच हे सार प्रत्यक्ष जगतोय. थोड्या फार फरकाने माझ्या बाबतीत पण हेच घडत होत, पण मी असा विचार कधीचं केला नव्हता.
सांग की कसं वागायला पाहिजे होत मी? काय सांगू मी तरी, माझ्याही बाबतीत असे प्रसंग घड्लेत पण मी असा कधीचं  विचार केला नाही रे अजून. " तर मग कर विचार. सहजता हेच एक साधन आहे आपल्याकडे ह्या प्रसंगात वापरायला. कारण ती गोष्ट घडत असताना आपण सारासार विचार करत नाही. आणि वेळ गेल्यावर पश्चातापाशिवाय हाती काही उरत नाही. तेंव्हा प्रत्येक गोष्टीकडे सहजतेने बघ, हे असेच घडणार होते हे मनाला पटवायला शिकव, म्हणजे अहंकार दुखावणारपण नाही आणि मुख्य म्हणजे सुखावणारपण नाही. दोन्हीही गोष्टी घातकच. ह्यातून सुयोग्य मार्ग म्हणजे घडलेला प्रसंग सहजते स्वीकारणे आणि त्यावर ताबडतोब कुठलीही प्रतिक्रिया देणे टाळणे म्हणजेच जगण्यातली खरी सहजता. काही काही प्रसंगात आपण उगाचच अर्थाचा अनर्थ करतो, स्वतःचा खोटा अहंकार जपतो, आणि मुख्यत्वे त्या घडलेल्या घटनेबद्दल करणे देत बसतो. चुकांचे भले मोठे गाठोडे असंख्य कारणांच्या खांद्यावर लादून आयुष्यभर स्वतःला बांधून घेतो आणि दोष मात्र देतो दुसर्यांना. -- ------------------ माझ्या मित्राच्या बाबतीत घडलेला हा प्रसंग असो की माझ्या, किंवा आणि कुणाच्या, पात्रे कुठलीही असोत कर्ते तर आपणच ना ?? घटना थोड्याफार फरकाने वेगळ्या असतील पण त्या किती सहजतेने आपण हाताळतो ह्यावरच सर्व अवलंबून आहे. होय ना, पटलं का???????